जागतिक बाल अधिकार दिनानिमित्त मुलांचा आवाज बुलंद; ‘चिल्ड्रन्स स्पीक’ उपक्रमांतर्गत अधिकारी भेट
रवि निषाद / मुंबई
मुंबई – जागतिक बाल अधिकार दिनानिमित्त ‘चिल्ड्रन्स स्पीक’ या उपक्रमाच्या माध्यमातून मानखुर्द, गोवंडी, चेंबूर आणि धारावी परिसरातील वस्त्यांमधील मुलांनी आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि वस्त्यांमधील गंभीर समस्यांबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन थेट व्यथा मांडली.
चेंबूर येथील उपनगर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात झालेल्या या संवादादरम्यान मुलांनी शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, मुलींची सुरक्षा, नशेचा वाढता प्रादुर्भाव, खेळाच्या मैदानांचा अभाव, शाळांमधील अपुऱ्या सुविधा, आधार कार्ड व जन्म दाखला नसल्याने शिक्षणापासून वंचित होणारी मुले, तसेच वस्त्यांमधील सामाजिक असुरक्षितता अशा अनेक मुद्यांवर अधिकारी समोर ठोस मांडणी केली.
मुलांनी स्पष्टपणे सांगितले की,
प्रभाग क्र. १३५ मध्ये आराखड्यात जागा असूनही सरकारी शाळा नाही; परिणामी ९०० हून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य आहेत.
काही शाळांमध्ये शौचालयांची दयनीय अवस्था असून काही ठिकाणी मुला-मुलींसाठी एकच शौचालय आहे. वस्त्यांमध्ये वाढता नशेचा विळखा मुलींसाठी मोठा धोका निर्माण करतोय. शाळा-घरी येताना मुलींना नशाखोरांकडून छेडछाड होत असल्याची तक्रारही या वेळी मुलांनी केली.
कचरा, दुर्गंधी, भरलेले गटार, आयर्न व फॉलिक अॅसिड गोळ्यांचा तुटवडा, उपेक्षित एचबीटी केंद्रामुळे बिघडलेले आरोग्य अशा समस्या देखील मुलांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्या. “आमचे हक्क राजकीय-सामाजिक कारणांमुळे बळी पडतात”, असा थेट आरोपही त्यांनी केला.
या वेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शरद कुऱ्हाडे व बाल संरक्षण अधिकारी मीरा गुडिले यांनी मुलांचे मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले. स्थानिक पोलिस, महानगरपालिका व इतर संबंधित विभागांशी समन्वयातून उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. शाळांमधील शौचालये व असुरक्षित वातावरणाबाबत अहवाल तयार करून कलेक्टर आणि शिक्षण विभागाकडे पाठविण्याचेही त्यांनी सांगितले.
जन्म दाखला किंवा आधार कार्ड नसल्याने एकही मूल शाळेबाहेर राहू नये, यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच बाल संरक्षणासाठी चाईल्डलाइन १०९८ ची माहितीही मुलांना देण्यात आली. नशेच्या वाढत्या प्रादुर्भावावर तातडीने पोलिस गस्त वाढवण्याची सूचना देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
मुलांनी चाईल्ड प्रोटेक्शन कमिटी लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी केली. त्यांनी आपले मागणीपत्र अधिकाऱ्यांना सुपूर्द केले.
या उपक्रमात जनजागृती विद्यार्थी संघ, स्नेहा, प्रेरणा, सीसीडीटी आदी संस्थांनी सहभाग घेतला. जनजागृती विद्यार्थी संघाचे सचिव संतोष सुर्वे यांनी मुलांना बाल अधिकार दिनाच्या शुभेच्छा देत मांडलेल्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.