भाईंदरमध्ये सराफाचा खून; नवघर पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
भाईंदर – भाईंदर पूर्व परिसरात प्रसिद्ध सराफ सुशांतो अबोनी पॉल (वय ५२) यांची त्यांच्या दुकानात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस.व्ही. रोडवरील सोन्याच्या दुकानातच पॉल काही दिवसांपासून राहत होते. कौटुंबिक वादामुळे त्यांनी घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले नसल्याने कामगार आणि कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने शंका घेऊन काही नागरिकांनी दुकानाची काच फोडून आत प्रवेश केला असता पॉल हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.
हत्या नेमकी का झाली? तिच्यामागचे कारण काय? आणि कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या गटाने हा खून केला असावा? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध कोनातून तपास सुरू असून सीसीटीव्ही फूटेज, संपर्क इतिहास आणि कौटुंबिक वादाच्या दृष्टीने चौकशी केली जात आहे.
या धक्कादायक घटननेमुळे भाईंदर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.