वाहतूक शाखेच्या तात्पुरत्या कार्यालयाला आग; जीवितहानी टळली
रवि निषाद / मुंबई
मुंबई – विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाणे अंतर्गत गांधी नगर जंक्शन येथे असलेल्या वाहतूक शाखेच्या तात्पुरत्या कार्यालयाला (कंटेनर) रविवारी सकाळी सुमारे ११.४५ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी समयसूचकता दाखवत आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.
आगीत कंटेनरमध्ये ठेवलेले कर्तव्यावरील अंमलदारांचे खाजगी कपडे, बॅगा, किरकोळ साहित्य व काही कार्यालयीन कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस व वाहतूक शाखेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
घटनेचे कारण प्राथमिक तपासात शॉर्टसर्किट असल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.