चाइल्ड सेफ्टी फोरमतर्फे बालदिनानिमित्त जाणीव-जागृती कार्यक्रम; २५७ मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
रवि निषाद / मुंबई

मुंबई – बैगनवाडी, गोवंडी येथील समाज कल्याण हॉलमध्ये चाईल्ड सेफ्टी फोरम–एम वॉर्ड तर्फे १५ नोव्हेंबर २०२५ रोजी बाल दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘बाल अधिकार जाणीव-जागृती’ आणि ‘बालदिन २०२५ अंतर्गत बालसभा’ या दोन महत्वाच्या उपक्रमांमुळे हा कार्यक्रम विशेष ठरला. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या संयुक्त सहभागातून आयोजित या कार्यक्रमात तब्बल २५७ मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला मानखुर्द व शिवाजी नगर पोलीस ठाणे, निर्भया पथक, समाज कल्याण विभाग, दिव्यांग विभाग, बाल कल्याण समिती, चाईल्ड लाईन तसेच स्थानिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्राची मान्चेकर, मंगेश घाडगे, संगीता मॅडम, बाल कल्याण समितीच्या पालकर मॅडम, अपनालयचे सीईओ प्रवीण सिंग, जीवनधाराच्या सीईओ शोभा डिसिल्वा, चाईल्ड लाईनच्या शोभा आगासे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात चाइल्ड सेफ्टी फोरमच्या माध्यमातून मुलांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विशेष सत्र घेण्यात आले. बालसभेदरम्यान मुलांनी निर्भीडपणे आपले प्रश्न व मागण्या सरकारी प्रतिनिधींसमोर मांडल्या.
मुलांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
१. मंडाला–मानखुर्द परिसरात शाळेअभावी शिक्षणातील अडथळे.
२. परिसरातील नशेची समस्या आणि मुलींच्या सुरक्षेची चिंता.
३. शाळांमधील अपुरे आणि अस्वच्छ शौचालयांचे संकट.
४. आधारकार्ड मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शिक्षणात निर्माण होणारे अडथळे.
या सर्व मुद्द्यांवर संस्थांच्या प्रतिनिधींनी मुलांचे म्हणणे ऐकून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात चाईल्ड सेफ्टी फोरमचे प्रकाश भोवर, वैशाली पवार, एजाज खान, शाकीर बागवान, युसुफ खान, सोमनाथ, लारा, तौकिर खान, नसीम खान यांनी महत्वाची भूमिका बजावली. विविध सामाजिक संस्थांना एकत्र आणण्याचे काम निमंत्रक संतोष सुर्वे यांनी प्रभावीपणे पार पाडले.
बालदिनानिमित्त आयोजित हा उपक्रम मुलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि त्यांच्या आवाजाला योग्य व्यासपीठ देणारा ठरला.