७५ वर्षांच्या प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरचं लज्जास्पद कृत्य; आईला बाहेर ठेवून २३ वर्षीय तरुणीला बेडरुममध्ये बोलावून विनयभंग
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण रायगड जिल्ह्यात वाढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंच्याहत्तर वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरने नातीच्या वयाच्या रुग्ण तरुणीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना अलिबाग येथील चेंढरे येथे समोर आली आहे.
मुंबईची २३ वर्षीय तरुणी उपचारासाठी तिच्या आईसोबत डॉक्टर भास्कर देसले (७५) यांच्याकडे आली होती. आरोपीने तिच्या आईला बाहेर ठेवून बेडरुममध्ये एकटीला बोलावले आणि लज्जास्पद कृत्य केले, असा आरोप पीडित तरुणीने अलिबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे.
पीडित तरुणीला अस्थमा आहे. आजारावर आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी ती आरोपी डॉक्टरकडे आईसह आली होती. मात्र तिला आरोग्य तपासणीसाठी नेताना आईला बाहेर पाठवून आरोपीने बेडवर झोपवलं. त्यानंतर तिच्या कपड्याच्या आत हात घालून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे तक्रारीत म्हले आहे. या घटनेने परिसरात संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे आरोपी वृद्ध असून समाजात विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळखला जात होता.
अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१९/२०२५, भा. न्या. सं. २०२३ नुसार दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक टिवरे करत आहेत. पोलीस घटनास्थळी सखोल चौकशी करत असून, आरोपीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.