सोमवारी महिलेवर लैंगिक अत्याचारचा प्रयत्न करत दागिने आणि मोबाईल घेऊन फरार झालेल्या आरोपीला अखेर बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत २९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी घडली. बोरिवली पश्चिम येथील सुधीर फडके पुलाखाली हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. महिला कामावर जात असताना एका व्यक्तीने तिला अडवून पुलाखाली एका निर्जनस्थळी नेले. तिच्यासोबत अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या महिलेने आरोपीला तिचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन दिला. त्यानंतर कशीबशी सुटका करुन घेत तिने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर झोन ११ चे पोलीस उपआयुक्त संदीप जाधव यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केले. रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर, उपनिरीक्षक तुषार सुखदेव यांच्या नेतृत्वाखालील मालवणी पोलीस शोध पथकाने काही तासांतच आरोपीला पकडले आणि बोरिवली पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी आरोपीकडून महिलेचे कानातले, सोन्याची अंगठी, Realme C55 मोबाईल फोन आणि हेडफोन यांसारख्या वस्तू जप्त केल्या आहेत. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५२,००० रुपये आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव संजय राजपूत आहे. तो दहिसरमधील प्रेम नगर येथील रहिवासी आहे. तो हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे आणि रस्ते झाडण्याचे काम करुन आपला उदरनिर्वाह करत असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बोरिवली पश्चिम येथील सुधीर फडके पुलासारख्या गजबजलेल्या परिसरात घडलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेने मुंबईकरांना हादरवून सोडले आहे. पीडित महिला कामावर जात असताना आरोपीने तिला पुलाखाली ओढून नेले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रसंगावधान राखून आपल्याकडील मौल्यवान वस्तू देऊन स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर ती तातडीने पोलिसांकडे पोहोचली आणि घडलेला प्रकार सांगितला.