मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; बीडमधून तिसऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. बीड पोलिसांनी या प्रकरणातील तिसरा आरोपी कांचन साळवी याला अटक केली असून, या अटकेनंतर प्रकरणाने नव्या वळण घेतले आहे.
यापूर्वी या प्रकरणात अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी सुपारी घेऊन जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर थेट गंभीर आरोप केले होते.
जरांगे यांनी दावा केला होता की, “धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचून अडीच कोटींची सुपारी दिली आहे.” या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
सध्या अटक केलेला आरोपी कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता व वैयक्तिक सहाय्यक असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. पोलिसांनी त्याला बीडमधून अटक केली असून, पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
जरांगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते, “कांचन साळवीने दोन्ही आरोपींना परळी येथे नेले होते. तिथे एका रेस्ट हाऊसमध्ये मोठी बैठक झाली. कांचन आला तेव्हा धनंजय मुंडे यांनी ती बैठक सोडून २० मिनिटांत तिथे हजेरी लावली. तेव्हा त्यांच्यात दोन कोटी रुपयांचा सौदा झाला आणि आणखी ५० लाख देण्याचे ठरले. याआधीही त्यांनी या हेतूसाठी पाच ते सहा कोटी रुपये खर्च केले आहेत,” असा आरोप जरांगे यांनी केला होता. या सगळ्या आरोपांनंतर आता तिसऱ्या आरोपीची अटक झाल्याने तपासाला वेग आला आहे. कांचन साळवी पोलिसांच्या चौकशीत कोणते खुलासे करतो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.