धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. हेमा मालिनी, ईशा देओल, बॉबी देओल व सनी देओल धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात होते. धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशा बातम्या आल्या. त्याचबरोबर त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या, त्यामुळे चाहते काळजीत होते. धर्मेंद्र यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. पण आता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अभिनेता बॉबी देओल धर्मेंद्र यांना रुग्णवाहिकेत घेऊन घरी पोहोचला आहे. धर्मेंद्र यांच्या घरासमोरचा व्हिडीओ वरिंदर चावला या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडीओमध्ये दिसतंय की आधी एक रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचली. त्याच पाठोपाठ बॉबी देओलही घरी पोहोचला. ब्रीच कँडी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आता त्यांच्या घरी नेण्यात आलं आहे.
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि घरीच त्यांची काळजी घेतली जाईल. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांनी या काळात धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा. त्यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. कृपया त्यांचा आदर करा कारण त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे,” अशी माहिती सनी देओलच्या मॅनेजरने दिली आहे.