शरणपूर रोड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल मच्छिंद्र पवारला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या शरणपूर रोड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल मच्छिंद्र पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत राहुल पवारला नांदगाव परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी वेशांतर करून दोन दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर ही धाडसी कारवाई केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे आठ वाजता बेथेलनगर, शरणपूर रोड परिसरात राहुल पवार आणि त्याच्या टोळीतील ५ ते ६ साथीदारांनी गैरकायद्याची गर्दी करून परिसरात दहशत माजवली होती. आरोपींनी कोयते, चॉपर आणि दांडके यांसारखी हत्यारे वापरून गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा आणि मोटारसायकलींच्या काचा फोडल्या. तसेच त्यांनी घरांवर काचेच्या बाटल्या फेकून स्थानिक नागरिकांना शिवीगाळ केली आणि जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. या दरम्यान आरोपी राहुल पवारने फिर्यादीस उद्देशून “तुझा गेमच वाजवतो” असे म्हणत कोयता उगारून खून करण्याचा प्रयत्न केला होता. तर सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरच्या घराबाहेर राहुल पवारने गोळीबार केला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर राहुल पवार हा फरार होता.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अंमलदार पोअं राहुल पालखेडे आणि पोहवा महेश साळुंके यांनी आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नांदगाव परिसरात लपला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने सलग दोन दिवस आणि दोन रात्री वेशांतर करून सापळा लावला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या वेशात राहून आरोपीचा पाठलाग केला आणि तो दुसऱ्या जिल्ह्यात पसार होण्याच्या तयारीत असताना सुमारे १० किलोमीटर अंतर पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोउनि किरण शिरसाठ, तसेच हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, नितीन जगताप, गोरक्ष साबळे, राम बर्डे, उत्तम खरपडे, मपोअं अनुजा येलवे आणि समाधान पवार या सर्वांनी ही कारवाई पार पाडली.