विरार ट्रॅफिक पोलिसांचा धक्कादायक प्रताप! कारवाई केलेली वाहने गोडाऊनला जमा न करताच त्यांची परस्पर विल्हेवाट
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – विरारमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर केल्या जाणाऱ्या दंडात्मक कारवाईत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा सनसनाटी आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पाटील यांनी केला आहे. ट्रॅफिक पोलिसांकडून कारवाई केलेली वाहने गोडाऊनला जमा न करताच त्यांची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अनंत पाटील यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार विरार मध्ये ट्रॅफिक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे उघडकीस आले आहे. वाहतूक पोलिसांनी कागदोपत्री जप्त केलेली अनेक वाहने प्रत्यक्षात मात्र गोडाऊनमध्ये जमा न करता, त्यांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. कागदोपत्री ‘जप्त’ दाखवलेली ही वाहने प्रत्यक्षात मात्र आजही रस्त्यावर बेधडकपणे फिरताना दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांच्या या अनागोंदी कारभाराचे पुरावे समोर आल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलिस दलात खळबळ माजली आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, एकदा जमा केलेल्या त्याच वाहनावर कागदोपत्री नोंदींमध्ये आणखी चार वेळा दंडात्मक कारवाई केल्याचे पुरावे माहिती अधिकारात समोर आले आहेत. याचा अर्थ, वाहतूक पोलिसांकडून वाहने जप्त करण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करून कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली जात आहे. वाहतूक पोलिसांच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा माहिती अधिकारामुळे पर्दाफाश झाला आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांनंतर विरार वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. मात्र, माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामुळे आता या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.