विवाहित प्रियकरासाठी ३ मुलांच्या आईनं प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी तत्काळ आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ठोकल्या बेड्या

Spread the love

विवाहित प्रियकरासाठी ३ मुलांच्या आईनं प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी तत्काळ आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

बदलापूर – बदलापूर शहरातून हादरवून टाकणारी एक थरारक घटना समोर आली आहे. तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्या विवाहित प्रियकरासोबत मिळून पतीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या दोघांनी मिळून मृतदेह गादीत गुंडाळून उल्हास नदीत फेकून दिला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिम भागात राहणारा ४४ वर्षीय व्यापारी आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह राहत होता. व्यवसायानिमित्त तो वारंवार बाहेरगावी जात असे. या काळात त्याच्या पत्नीचे त्याच इमारतीत राहणाऱ्या एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांनी हे संबंध पतीच्या लक्षात आले आणि त्यावरून घरात सतत वाद सुरू झाले.

शुक्रवारी मध्यरात्री जेव्हा पती गाढ झोपेत होता, तेव्हा पत्नीने आपल्या प्रियकराला घरात बोलावले. दोघांनी मिळून आधी नियोजन केलं आणि नंतर दोरीने गळा आवळून पतीचा खून केला. त्यानंतर मृतदेह गादीत गुंडाळला आणि मोटरसायकलवरून जाऊन उल्हास नदीपात्रात जाऊन फेकून दिला.

दुसऱ्या दिवशी स्थानिकांना नदीपात्रात मृतदेह आढळून आला. तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. तपासादरम्यान पोलिसांना संशय पत्नीवर गेला आणि चौकशीतच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपी पत्नी आणि तिच्या विवाहित प्रियकराला अटक केली आहे. या घटनेने बदलापूर परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून या थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्याने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon