मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून, आरोपी हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. यासंदर्भात जरांगे यांचे एका निकटवर्तीय सहकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाचा गंभीर खुलासा केला.
जरांगे पाटील म्हणाले, “बीडचा एक कार्यकर्ता एका आरोपीकडे गेला आणि खरी सुरुवात तिथून झाली. मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली. आधी जेवणात विष टाकून मारण्याचा कट रचला गेला होता. बीडमधील ‘कांचन’ नावाचा व्यक्ती धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए आहे.”
पुढे बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत म्हटलं की, “धनंजय मुंडे यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचले. त्या कार्यकर्त्याने आरोपींना परळीला नेलं, तिथे बैठक झाली. त्या बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित होते आणि त्यांनी आरोपींसोबत सुमारे २० मिनिटं चर्चा केली. आरोपींना हे काम करण्यास त्यांच्याकडूनच सांगण्यात आलं.”
जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, आरोपींसोबत झालेल्या बैठकींची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. “हे राजकारणाचं घाणेरडं रूप आहे. मुख्यमंत्री साहेबांनी अशा प्रवृत्तीचा शेवट करावा. मी पोलिसांना सहकार्य करीन, पण या कटाचा सूत्रधार धनंजय मुंडे आहेत, हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध झालं आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, जालना पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून दोघांवर कोणाच्या सांगण्यावरून धमकी देण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे.