लाचखोर वरिष्ठ लिपीक रंगेहात अटकेत; अकोल्याचे एसपींची झटपट कारवाई, तात्काळ निलंबन

Spread the love

लाचखोर वरिष्ठ लिपीक रंगेहात अटकेत; अकोल्याचे एसपींची झटपट कारवाई, तात्काळ निलंबन

पोलीस महानगर नेटवर्क

अकोला : पोलिस विभागाची प्रतिमा मलिन करणाऱ्या लाचखोरीच्या प्रकारावर अकोल्याचे पोलीस अधीक्षकांनी कडक भूमिका घेत तात्काळ कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपीक ममता संजय पाटील या महिला कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यांना त्वरीत प्रभावाने निलंबित केले.

तक्रारदार हे धान्य खरेदी-विक्री व्यवसायात कार्यरत असून त्यांच्या वेअरहाऊसमधील धान्य कैलास ओमप्रकाश अग्रवाल या कमिशन बेसवरील कामगाराने अनुमतीशिवाय विकून फसवणूक केली होती. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराने पोलीस अधिकाऱ्याने आरोपीस मदत केल्याचा आरोप करून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी एसपी कार्यालयात केली.

या अर्जावर पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ लिपीक ममता पाटील यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेनंतर ८ हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले.

घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी तत्परता दाखवत ममता पाटील यांना निलंबित केले. त्यांच्या कृत्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलीन झाल्याचे अधोरेखित करत एसपींनी स्पष्ट केले की, “लाचखोरीच्या प्रकरणांबाबत विभागात शून्य सहनशीलता धोरण (Zero Tolerance Policy) राबविण्यात येत आहे. कोणताही कर्मचारी लाच घेताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

नागरिकांसाठी आवाहन :

पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, एसपी कार्यालयात कोणत्याही कामासाठी कोणीही पैशाची मागणी करत असल्यास, तक्रारदारांनी थेट दररोज सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक, अकोला यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती द्यावी. अशा तक्रारींवर तात्काळ आणि पारदर्शक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon