फेसबूकवर मैत्री, पोलीस असल्याचा बनाव आणि शरिरसंबंध ठेवत लाखोंचा गंडा; भिगवण पोलिसांकडून आरोपीला अकलूज मधून बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो महिलांशी ओळख करायचा. त्यानंतर तो आपण पोलीस अधिकारी असल्याचं ही त्यांना सांगायचा. मदतीच्या नावाने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. मग शरिरसंबंध, पैशांची देवाण घेवाण, दागिने यांच्यावर डल्ला मारायचा. हे सर्व मिळालं की हा पठ्ठ्या भूर्रर्रर्र होवून जायचा. त्यांना अशी अनेक वेळा केले. ती त्यांची सवय झाली होती. पण शेवटी पोलीसांच्या नजरेतून तो कधीपर्यंत वाचणार होता. एका महिनेने तक्रार केली अन् अगदी चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने हा ठग जाळ्यात अडकला. पुण्याच्या भिवगवण पोलीसांनी ही कारवाई केली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील गणेश शिवाजी कारंडे असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला पुण्याच्या भिगवण पोलिसांनी अकलूज मधून बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. फेसबूक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिला त्याने व्यावसायिक मदत करण्याचे आमिष दिले होते. पण तिचे लैंगिक शोषण केले गेले. ऐवढेच नाही तर त्याने तिच्याकडून दागिने व पैसे घेत तिची फसवणूक केली.
त्यानंतर तो गायब झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे हे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने पुणे जिल्ह्यातील भिगवण इथं तक्रार नोंदवली. पोलीसांनी ही प्रकरणाचे गांभिर्य ओळखले. शिवाय फसवणूक करणारी व्यक्ती ही पोलीस असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पोलीसांनी अधिक वेगानी सुत्र हलवली. कारंडे याच्यावर यापूर्वी अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर आणि लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवरील अत्याचार व फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई भिगवण पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कारंडे फेसबुकवर ‘संग्राम पाटील’ आणि ‘पृथ्वीराज पाटील’ याने बनावट प्रोफाइल तयार केले.यातून तो स्वतःला पोलिस अधिकारी आहे असं भासवत होता. यातून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेत असे. आरोपीने पिडीत महिलेशी फेसबुक व्दारे ओळख करून तिला ब्युटी पार्लरसाठी बँकेतुन ६ लाख रूपये लोन काढुन देतो असे सांगितले होते. मात्र तुला माझ्या बायकोची बहीण म्हणुन सही करावी लागेल अशी अट घातली. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा ते दोन च्या सुमारास मदानवाडी इथल्या एका लॉजमध्ये पिजीतेला नेले. तिथे चार ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स व सहा हजार रोख रक्कम आणि मोबाईल असे पर्समध्ये ठेवण्यास सांगितले.
बँकेमधील लोनच्या फॉर्मवर फिर्यादीच्या अंगावरील तिळ व खुणा दाखविण्यासाठी पीडितेला लॉजमध्ये नेवुन दमदाटी करून फिर्यादीचे सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. फिर्यादीचे नकळत बॅगमधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ७३ हजार रू किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. या सर्व घटने प्रकरणी भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी पोलीस पथक आरोपीच्या शोध कामी रवाना केले. तपास पथकामधील पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो आपले नाव बदलुन, पोलीस अधिकारी असल्याचे भासवुन अशाच प्रकारे महीलांची फसवणुक करीत असल्याची माहीती मिळाली.
त्याचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना तो अकलुज पोलीस स्टेशनचे हद्दीत तो मिळून आला. त्याने मदनवाडी येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ के.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे,पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, संतोष मखरे, प्रमोद गलांडे, गणेश पालसांडे, वैष्णवी राऊत भिगवण पोलीस स्टेशन यांनी केली आहे.