कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईचं भीषण वास्तव; वैतागलेल्या दिव्यांग वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरातील एमआयडीसी निवासी भागामध्ये गेले अनेक दिवस भीषण पाणी टंचाईने नागरिक त्रस्त आहेत. घरामध्ये अंघोळीसाठी किंवा पिण्यासाठीही पाणी नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर पाणी समस्येला कंटाळून, एमआयडीसी निवासी भागातील ७६ वर्षीय काशीनाथ सोनावणे या दिव्यांग वयोवृद्धाने आपल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. अनिल शिंदे या तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वयोवृद्ध सोनावणे यांचा जीव वाचला. मात्र, या घटनेने पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसी निवासी भागात गेले आठवडाभर अनेक इमारतींना पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. पाण्याअभावी नागरिक हैराण झाले आहेत. याच त्रासाला कंटाळून गुरुदेव सोसायटीमध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध सोनावणे यांनी टेरेसवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अनिल शिंदे या तरुणाने त्यांना पाहिले आणि ‘थांबा काका, मी आलो’ असे सांगत धाव घेतली. त्यांची समजूत काढून त्यांना सुखरूप खाली आणले. या घटनेने पाणी टंचाईमुळे लोकांची सहनशीलता संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी नागरिक एमआयडीसी कार्यालयात गेले असता, अधिकाऱ्यांनी त्यांना थातूरमातूर उत्तरे दिली होती. ‘पाईपलाईन बदला’ किंवा ‘तपासणी करतो’ असे सांगत अधिकारी वेळ मारून नेत होते.
नागरिकांचा रोष वाढत असल्याचे पाहून आमदार राजेश मोरे यांनी पाणी प्रश्नावर एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना हा प्रश्न तातडीने सोडवण्याची सक्त सूचना दिली. मात्र, या बैठकीदरम्यान संतप्त नागरिकांनी आमदारांना थेट सवाल केला. “गेले आठ दिवस आम्हाला पाणी मिळत नाही, मात्र याच परिसरातील टँकर माफियांना पाणी कसे मिळते? पाणी पुरवठा कपात केवळ आमच्यासाठीच का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.
आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले की, २७ गावांमधील पिसवली, देशमुख होम, गोळवली, दावडी, रिजेन्सी या परिसरामध्ये गेल्या महिन्याभरापासून पाणी टंचाई आहे. दिवाळीनंतर एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा कमी झाला आहे. अमृत योजनेचे काम सुरू असले तरी, सध्या तातडीने पाणी प्रश्न सुटला पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला. जर गुरुवारपर्यंत पाणी प्रश्न मिटला नाही, तर पुन्हा अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन आमदार राजेश मोरे यांनी दिले.