आता डोंबिवलीत ही वोट चोरी उघड! महिला १ पण वोटर आयडी २, नाव-पत्ता सेम, फक्त फोटो वेगळा
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – मतदार यादी संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. निवडणूक आयोगावर विरोधकांकडून टिका केली जात आहे. हे सगळे सुरु असताना डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचे दोन वोटर आयडी कार्ड समोर आले आहे. यावर नाव पत्ता सेम आहे. त्यावर फोटो मात्र वेगवेगळा आहे. या वरुन शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टिका केली आहे. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या महिलेचे दोन वोटर कार्ड समोर आली आहेत ती महिला ही निवृत्तय पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे.
डोंबिवलीत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अशोक कुलकर्णी राहतात. त्यांनी वोटर कार्डसाठी प्रक्रिया केली होती. पोस्टामार्फत त्यांच्या घरी पाच वोटर आयडी कार्ड आले. मात्र त्यांची पत्नी अर्चना कुलकर्णी यांच्या नावाने दोन वोटर आयडी कार्ड आली. यामध्ये नाव पत्ता सेम होता. त्यात एका वोटर आयडीवर फोटो दुसऱ्या महिलेचा आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टिका केली आहे.
यासंदर्भात अशोक कुलकर्णी यांनी सांगितले, मी पोलिस खात्यात कामाला होता. २००७ ला सेवा निवृत्त झालो. पाच वोटर आयडी कार्ड दोन महिन्यापूर्वी आमच्या घरी आले. त्यात पत्नीच्या नावे दोन वोटर आयडी कार्ड आले. त्यावर नाव पत्ता सेम आहे. एका वोटर आयडी कार्डवर दुसऱ्याच महिलेचा फोटो आहे. पोस्टाने आलेल्या वोटर आयडी कार्ड बद्दल मला निवडणूक आयुक्ताना कळवायचे आहे. हे असे कसे झाले? असा जाब विचारणार आहे. असं ही या निमित्ताने म्हणाले.
ठाकरे गटाचे पदाधिकारी राजेंद्र सावंत यांनी सांगितले की, माजी पोलिस अधिकारी आमच्या शहर कार्यालयात आले. त्यांच्या पत्नीचे दोन वोटर आयडी कार्ड आले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचे दोन वोटर आयडी कार्ड बाबत हा प्रकार घडला आहे. तर सामान्य नागरीकांनी करायचे काय. याचा जाब आम्ही महाराष्ट्र सरकार, निवडणूक आयोगला विचारायचा की वोटर आयडी कार्ड पाठविणाऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गाला विचारायचा ? असा संतप्त सवाल सांवत यांनी उपस्थीत केला आहे.