छेडछाड व मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या; पोलिसांना सुसाईड नोटही सापडली
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – छेडछाड व मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची प्रकार ठाण्यातील मुंब्र्यातील संजय नगरमधून समोर आला आहे. तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वडील महिंद्रा पांडे हे ऑटो रिक्षा चालक आहेत. त्यांच्या कुटुंबाने माहिती दिली की, परिसरातील काही युवकांकडून तरुणीला सतत छेडछाड केली जात होती आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या नोटमध्ये काही विशिष्ट व्यक्तींची नावे नमूद असून, त्यांच्या त्रासामुळेच आत्महत्या करत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. पोलीस सध्या या सुसाईड नोटच्या आधारे सखोल तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनेनंतर संजय नगर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सदर परिसरात रात्रीच्या वेळी काही युवकांची मोठी गर्दी जमते आणि याच ठिकाणी छेडछाडीचे प्रकार घडतात. पोलिसांनी अशा प्रवृत्तीवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी, मृत तरुणीचे वडील महिंद्रा पांडे यांच्या नेतृत्वाखालील रिक्षा युनियन आणि स्थानिक नागरिक उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करणार आहेत. तसेच, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देखील देण्यात येणार आहे.