कार्तिक स्नानासाठी गंगाघाटावर जाणाऱ्या महिलांचा रेल्वेखाली मृत्यू; मिर्झापूरमध्ये भीषण दुर्घटना
योगेश पांडे / वार्ताहर
मिर्जापूर – कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगा स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर मिर्झापूर येथे काळाने झडप घातली. बुधवारी सकाळी चुनार रेल्वे स्टेशनवर झालेल्या भीषण अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर रेल्वे स्टेशनवर क्षणात भीषण दृश्य निर्माण झाले, रुळांवर मृतदेहांचे तुकडे सुमारे ५० मीटरपर्यंत विखुरले होते.
सकाळी साडेनऊच्या सुमारास चोपनहून आलेली एक प्रवासी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबली होती. गर्दी प्रचंड असल्याने काही यात्रेकरूंनी रुळ ओलांडून दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरुद्ध दिशेने वेगाने धावणारी कालका एक्सप्रेस आली आणि या यात्रेकरूंना धडक दिली. धडकेत सात ते आठ जण उडून गेले, त्यापैकी सहा महिलांचा मृत्यू झाला.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कालका एक्सप्रेसला चुनार येथे थांबा नसल्याने ती पूर्ण वेगाने स्टेशन पार करत होती. गर्दी असूनही वेग कमी करण्यात आला नाही, अशी नागरिकांनी तक्रार केली आहे. अपघातानंतर स्टेशन परिसरात गोंधळ उडाला. मृतदेह गोळा करून पॉलिथिन पिशव्यांमध्ये ठेवत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
मृतांपैकी पाच महिला मिर्झापूर जिल्ह्यातील असून एक महिला सोनभद्र जिल्ह्यातील आहे. सर्वजण खमारिया परिसरातील असून गंगेत स्नानासाठी वाळू घाटावर जात होते, असे प्रत्यक्षदर्शी भागीरथी यांनी सांगितले.
अपघातानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून तात्काळ मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे मंत्री संजीव गौर आणि जिल्हाधिकारी पवन गंगवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. प्लॅटफॉर्म बदलताना योग्य सुरक्षितता का ठेवली गेली नाही, तसेच गर्दी असूनही गाडीचा वेग कमी का केला गेला नाही, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.