रोहित आर्या एन्काऊंटरला नवं वळण!

Spread the love

रोहित आर्या एन्काऊंटरला नवं वळण!

पोलीसांवर जाणीवपूर्वक छातीत गोळी मारल्याचा आरोप; रीट याचिका दाखल होणार

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्य सरकारचं स्वच्छता मॉनिटर नावाचं अभियान चालवणाऱ्या रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणात आता नवनवीन अपडेट समोर येत आहे. सरकारने दोन कोटीहून अधिकची थकबाकी न दिल्याने रोहित आर्याने १७ मुलांना ओलीस ठेवलं होतं. आपल्याला तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, दहशतवादी विरोधी पथकाने रोहित आर्याचं एन्काऊंटर केलं. या एन्काऊंटवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

काहींनी या एन्काऊंटरचं समर्थन केलं आहे. तर काहींनी एन्काऊंटरची गरज नसल्याचा युक्तिवाद केला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर अडव्होकेट नितीन सातपुते यांनी या सगळ्या एन्काऊंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रोहित आर्याचा एन्काऊंटर सरकारला आणि पोलिसांना टाळणं शक्य होतं, परंतु जाणीवपूर्वक त्याच्या छातीत गोळी घालण्यात आली, असं विधान नितीन सातपुते यांनी केलं. शिवाय या संदर्भात चौकशी व्हावी, यासाठी कोर्टात जाणार असल्याचं देखील ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी सांगितलं.

पोलिसांनी आर्याच्या पायावर गोळी झाडायला हवी होती. पण पोलिसांनी त्याच्या छातीत गोळी मारली. या अपहरणासाठी राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. राज्य सरकारने त्याची दोन कोटींची फसवणूक केली. त्याची अधिकृत देयकं न दिल्याने आर्या प्रचंड आर्थिक तणावात होते. पोलीस यंत्रणेचं अपयश लपवण्यासाठी ही चकमक घडवली, असा दावाही सातपुते यांनी केला.

रोहित आर्य याच्या अनेक मागण्या सरकारच्या आडमुठे भूमिकेमुळे अपुऱ्या राहिल्या. रोहित आर्याचे पैसे थकीत होते, म्हणूनच त्यांनी टोकाची भूमिका घेतली. मुलांना बंधक बनवणं ही कृती चुकीची आहे. या एन्काऊंटर बाबत चौकशी करण्यासाठी रीट याचिका दाखल करावी लागणार आहे, असंही सातपुते म्हणाले. शिवाय पोलीस आयुक्तांनी एअरगनबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon