ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना!
२४ तासात धमकी केली खरी, प्रियकराने ने घरात घुसून १७ वर्षीय तरुणीला जिवंत जाळलं
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १७ वर्षीय मुलाने प्रेम प्रकरणातून आपल्या प्रेयसीला जिवंत जाळलं आहे. घरात कुणी नसल्याचं हेरून आरोपी पीडितेच्या घरात घुसला आणि त्याने थेट पेटवून दिलं आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीररित्या भाजलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. ठाण्यातील कापूरबावडी परिसरात ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हे दोघेही अल्पवयीन आहेत. मृत मुलगी आधी चेंबूर येथे राहत होती आणि हल्लेखोर मुलगा चेंबूरचाच रहिवासी आहे. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता.
चार दिवसांपूर्वी आरोपी मुलगा ठाण्यातील कापूरबावडी येथील मुलीच्या घरी आला. तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. हे पाहून त्याने तिला गाठले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि या वादातून संतापलेल्या मुलाने थेट मुलीला पेटवून दिले. या भयानक हल्ल्यात मुलगी ८० टक्के भाजली.
घटनेनंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,सोमवारी रात्री अचानक तिची तब्येत खूपच खालावली. त्यामुळे तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, मंगळवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेच्या काही दिवसांपूर्वी, मुलगी भाऊबीज सणासाठी चेंबूर येथे गेली असता, आरोपी मुलाने तिला मारहाण केली होती आणि ‘मी तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकीही त्याने सर्वांसमक्ष दिली होती. ही धमकी त्याने आज प्रत्यक्षात आणल्याचे उघड झाले आहे.ठाणे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कापूरबावडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.