मुंबई पोलिसांची मोठी कारवाई : दुबईतून दाऊद गँगचा ड्रग्ज मास्टरमाइंड सलीम शेख अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राईम ब्रँच) मोठं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत दाऊद इब्राहिमच्या डी-गँगला जबर धक्का दिला आहे. दुबईतून चालवल्या जाणाऱ्या या नेटवर्कचा पर्दाफाश करत पोलिसांनी मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याला अटक करून भारतात आणलं आहे. सलीम हा कुख्यात तस्कर सलीम डोळाचा निकटवर्तीय असल्याचं उघड झालं असून, या प्रकरणात २५६ कोटींहून अधिक किमतीचा मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी २०२५ मध्ये झाली. क्राईम ब्रँच युनिट-७ ने कुर्ला परिसरातून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला ६४१ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि १२.२० लाख रोख रकमेसह अटक केली होती. चौकशीत परवीनने कबूल केलं की, तिला हे ड्रग्ज मिरा रोड येथील साजिद शेख उर्फ डैब्ज याच्याकडून मिळाले होते.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी साजिदला अटक केली असता त्याच्या घरातून तब्बल ३ किलो मेफेड्रोन, म्हणजेच सुमारे ६ कोटी रुपयांचा माल, जप्त करण्यात आला. साजिदच्या चौकशीतून या रॅकेटचे धागेदोरे थेट दुबईतील सलीम शेखपर्यंत पोहोचले. तपासात समोर आलं की सलीम हा दुबईतून संपूर्ण नेटवर्क नियंत्रित करत होता.
पुढील तपासात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इरली गावाशी या टोळीचा थेट संबंध असल्याचं उघड झालं. २८ मार्च २०२५ रोजी पोलिसांनी सांगलीतील एका अवैध फॅक्टरीवर छापा टाकून १२२.५ किलो मेफेड्रोन, ड्रग्ज निर्मितीचं साहित्य आणि एक वाहन जप्त केलं. या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, फॅक्टरीसाठी लागणारा कच्चा माल संयुक्त अरब अमिरातीतील एका केमिकल कंपनीतून मागवला जात होता, असा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी सलीम शेख हा दुबईत लपून बसल्याने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर दुबई पोलिसांच्या मदतीने सलीम शेखला अटक करून भारतात आणण्यात आलं.
या संपूर्ण तपासात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत २५६ कोटी रुपयांहून अधिक असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
> मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे दुबईहून चालवल्या जाणाऱ्या दाऊद गँगच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.