दुबईहून भारतात मेफेड्रॉन पुरवठ्याचे जाळे उद्ध्वस्त; पाहिजे आरोपी मो. सलीम शेख अखेर तुरुंगवासात!
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – भारतामध्ये मेफेड्रॉन (एमडी) सारख्या घातक अंमली पदार्थांचा पुरवठा दुबईहून संचालित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा अखेर मुंबई पोलिसांनी पूर्णत: पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील पाहिजे आरोपी मो. सालीम मो. सुहेल शेख याला दुबईतून भारतात आणून अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष-७, घाटकोपर पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई पार पडली.
प्रकरणाचा उलगडा कसा झाला?
१६ फेब्रुवारी २०२४ रोजी कुर्ला (पश्चिम) येथे सापळा रचून परवीन बानो गुलाम शेख हिच्याकडून ६४१ ग्रॅम मेफेड्रॉन, ₹१२.२० लाख रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.
तपासात तिने कबूल केले की हा अंमली पदार्थ तिला दुबईतील आरोपींकडून मिळालेल्या संपर्कांद्वारे साजिद शेख उर्फ डॅब्स याच्याकडून मिळाला होता.
साजिदला अटक करून त्याच्या मिरा रोड येथील घरातून तब्बल ३ किलो मेफेड्रॉन (किंमत ₹६ कोटी) आणि ₹३.६८ लाख रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील इरळी गावातील मेफेड्रॉन तयार करणारा कारखाना उध्वस्त केला. तेथे तब्बल १२२.५०० किलो मेफेड्रॉन (किंमत ₹२४५ कोटी), कच्चा माल आणि वाहने जप्त झाली. या कारवाईत सहा आरोपी अटकेत आले.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यावर आळा
या प्रकरणात आतापर्यंत ₹२५६.४९ कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे. त्यात अंमली पदार्थ, रोख रक्कम, दागिने, वाहने आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
ताहेर सलीम डोला आणि मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला या दोघांना यापूर्वीच भारतात आणून अटक करण्यात आली होती. ताज्या घडामोडीत पाहिजे आरोपी मो. सालीम मो. सुहेल शेख याला रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे यूएईमध्ये अटक करून भारतात आणण्यात आले, आणि २२ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक दाखल करण्यात आली.
न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जप्त मुद्देमालाचा तपशील
मेफेड्रॉन (एमडी) १२६.१४१ किलो ₹२५२.२८ कोटी
रोख रक्कम — ₹४.१९ कोटी
सोन्याचे दागिने — ₹१.५० लाख
स्कोडा कार — ₹१० लाख
मोटारसायकल — ₹५०,०००
एकूण जप्त मुद्देमाल किंमत ₹२५६,४९,९६,६२०/-
ही भव्य कारवाई मा. पोलीस आयुक्त देवेन भारती, मा. पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाई करणाऱ्या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, स.पो.नि. धनाजी साठे, पो.उ.नि. स्वप्निल काळे, पो.उ.नि. महेश शेलार, पो.उ.नि. सावंत, पो.हवा. कांबळे, पो.ह. राऊत, पो.शि. होनमाने आणि पो.ह.चा. राठोड यांनी मोलाचे योगदान दिले.
या कारवाईमुळे महाराष्ट्रातील मेफेड्रॉन निर्मिती आणि विक्रीचे मोठे जाळे उद्ध्वस्त झाले असून, अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला नवे बळ मिळाले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे राज्यात अंमली पदार्थांचा प्रवाह रोखण्यात मोठे यश मिळाले आहे.