पुरेशी नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी संतप्त; रस्त्यावर नोटा उडवून व्यक्त केला संताप
योगेश पांडे / वार्ताहर
हिंगोली – राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच कंबरडं मोडलं आहे. मराठवाड्यात तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालीय. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात आहे. त्याचवेळी हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शेतकरी रस्त्यावर १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटा हवेत उडवून त्यांचा तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसंच त्यांना सरकारी मदत यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे अनोखे निषेध आंदोलन केले.
क्रांतिकारी किसान संघ’ च्या कार्यकर्त्यांनी गोरेगाव येथील उपरी तहसील कार्यालयाच्या समोर हे आंदोलन केले. याबाबत माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने नुकताच अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांसाठी मोठा राहत पॅकेज जाहीर केला होता. मात्र, या यादीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि शेणगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला नाही.
शेतकऱ्यांनी सांगितलं की, त्यांच्या भागातही सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि ज्वारी यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाली आहेत. असे असतानाही सरकारने या भागांना मदत क्षेत्राबाहेर ठेवले आहे, जो एक अन्यायकारक निर्णय आहे.
व्हिडिओमध्ये आंदोलक शेतकरी स्पष्टपणे सांगत आहेत की, “हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले असतानाही, राज्याचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी शेणगाव आणि हिंगोली तालुक्याला राहत पॅकेजपासून वेगळे ठेवले आहे. आम्हाला या पॅकेजमधून वगळले असेल, तर आम्हाला हे पैसे नको आहेत! आम्ही ते सरकारच्या तोंडावर फेकत आहोत!”
या आंदोलक शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे की, सरकारने आम्हाला मदत पॅकेजमधून वगळले असल्याने हे तुटपुंजे पैसे (नुकसान भरपाई) आम्हाला नको आहे. या निषेधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे सरकारी निर्णय तसंच आणि शेतकरी बांधवांच्या परिस्थितीवर चर्चा सुरू झाली आहे.