पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई; एक कोटीच्या बनावट नोटा सह पाच आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
सांगली – सांगलीमधील मिरजजवळील निलजी-बामणी रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडलं. त्याच्याकडून तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सुप्रीत कडप्पा देसाई (२२) याच्याकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आलं. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र हारगे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ४२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर ही पहिलीच कारवाई आहे. झेरॉक्स मशीन, बनावट नोटा मोजण्याचं मशीन, स्कॅनर आणि प्रिंटर जप्त करण्यात आलं आहे. आरोपीकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. मिरजमध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे प्रसारमाध्यमांशी बोलत होते, यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते.
अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल ५ लाखांची खंडणी मागणाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी प्रकरण मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणी गुरुवारी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी तीन महिलांसह एका अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र या टोळीचा मुख्य सूत्रधार नेताजी शिंदे कारवाई दरम्यान पसार झाला आहे. तो सोलापूरच्या मुळेगाव येथील असल्याची माहिती समोर येत आहे.