शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची एक कोटींची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पाषाण येथील एका व्यावसायिकाची तब्बल ₹१ कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तक्रारदार व्यावसायिक पाषाण परिसरात वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात त्यांच्या मोबाईलवर शेअर बाजार गुंतवणुकीसंबंधी आकर्षक ऑफरचा संदेश आला होता. स्वतःला गुंतवणूक सल्लागार संस्थेचा प्रतिनिधी म्हणून ओळख करून देत सायबर चोरट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला.
यानंतर व्यावसायिकाला एका सोशल मीडियावरील गुंतवणूक गटात सामील करण्यात आले. त्या गटात विविध गुंतवणूक योजनांची माहिती देऊन चांगल्या नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला विश्वास बसावा म्हणून व्यावसायिकाने थोडीशी रक्कम गुंतवली. त्यानंतर चोरट्यांनी खोटा परतावा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
यामुळे व्यावसायिकाने गेल्या चार महिन्यांत टप्प्याटप्प्याने ₹१ कोटी ११ लाख ८० हजार रुपये विविध खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने वर्ग केले. मात्र, काही दिवसांनंतर परतावा न मिळाल्याने संशय आल्यावर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधितांनी फोन आणि चॅटवरून संपर्क तोडला.
फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सायबर गुन्हे शाखेकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, “अनधिकृत ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया गट किंवा अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफरला बळी पडू नये.”