ऑनलाईन गेमिंगमधील कर्जबाजारीपणातून भयावह कृत्य! विरारमध्ये एकाच कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी ७२ तासांत आरोपीला पकडलं
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – ऑनलाईन गेमिंगच्या नशेत ४० लाखांचे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने चोरीच्या उद्देशाने घरात घुसून एकाच कुटुंबातील तीन जणांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना विरार (पश्चिम) येथील अर्नाळा गावातील बंदरपाडा परिसरात सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणाचा अवघ्या ७२ तासांत उलगडा करत क्राईम ब्रांच युनिट ३ च्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
अटक झालेल्या आरोपीचे नाव दीपेश अशोक नाईक (वय २९, रा. अर्नाळा गाव) असे असून, तो दक्षिण मुंबईतील एका खाजगी संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पोलिसांनी त्याला मुंबईतून जेरबंद केले.
चौकशीत दीपेशने दिलेल्या कबुलीनुसार, ऑनलाईन गेमिंगमधून तो तब्बल ४० लाख रुपयांच्या कर्जाच्या गर्तेत सापडला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोवारी कुटुंबाच्या घरात चोरीसाठी शिरल्यानंतर घरच्यांनी आरडाओरडा केल्याने पकडले जाईल या भीतीने त्याने चाकूने हल्ला चढवला.
या हल्ल्यात जगन्नाथ गोवारी (७६), लीला गोवारी (७२) आणि नेत्रा गोवारी (५२) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, क्राईम ब्रांच युनिट ३ चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत अवघ्या तीन दिवसांत त्याला अटक केली.
या कारवाईबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी माहिती दिली असून, आरोपीविरुद्ध हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.