पुण्यात धक्कादायक उघड!
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुण्यातून मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
विशेष म्हणजे, सचिन घायवळवर यापूर्वी आर्मस ऍक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील पोलिसांचा ठाम विरोध डावलून, त्याला २० जून रोजी शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. या निर्णयावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देऊ नये, असा नकारात्मक अहवाल सादर केला होता. मात्र, तो नजरेआड करून गृहराज्यमंत्री कदम यांनी स्वतःच्या सहीने परवाना मंजूर केल्याचे दस्तऐवज समोर आले आहेत.
दरम्यान, निलेश घायवळच्या टोळीवर पुणे पोलिसांनी अलीकडेच मोठी कारवाई केली आहे. त्याच्या मालमत्तांवर पुणे, जामखेड, अहमदनगर, धाराशिवसह ४० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरच त्याच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
राजकीय वर्तुळातही या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. शिवसेनेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या समीर पाटील यांच्यावर आरोप केले होते. आता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्याचं नाव या प्रकरणात जोडलं गेल्याने नवे वाद पेटले आहेत.
सचिन घायवळला देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याच्या अधिकृत प्रतित स्पष्टपणे लिहिलं आहे की,
> “राज्य शासनाकडून मिळालेल्या अधिकारानुसार मी संबंधितास शस्त्र परवाना मंजूर करीत आहे.”
या आदेशावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सही आहे.
या घटनेमुळे प्रशासनात वर्तणुकीचे निकष आणि गुन्हेगारांना मिळणारे राजकीय आश्रय या मुद्द्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.