नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; लवकरच प्रवासी उड्डाणांना सुरुवात

Spread the love

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; लवकरच प्रवासी उड्डाणांना सुरुवात

पोलीस महानगर विशेष

नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे भव्य उद्घाटन पार पडले. या विमानतळाची उभारणी एकूण चार टप्प्यांत करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील टर्मिनल १ आणि रनवे १ चे काम पूर्ण झाले आहे. या विमानतळावरून प्रवासी आणि कार्गो वाहतूक सेवा पुढील दोन महिन्यांत, म्हणजे डिसेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

उद्घाटनाआधी पंतप्रधान मोदी यांनी विमानतळाच्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली आणि उभारणीदरम्यान झालेल्या कामांचा आढावा घेतला. हा विमानतळ मुंबईनंतरचा दुसरा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ ठरणार असून, आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जात आहे.

अदानी समूह आणि सिडको यांच्या संयुक्त सहकार्याने या विमानतळाची उभारणी होत आहे. प्रकल्पामध्ये अदानी समूहाचा ७४ टक्के तर सिडकोचा २६ टक्के मालकीहक्क आहे. २०१८ मध्ये भूमिपूजनानंतर सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासह अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींवर मात करावी लागली. अखेर सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टर्मिनल १चे काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी जोर धरत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याबाबत स्थानिक जनप्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या उद्घाटन भाषणात या संदर्भात घोषणा करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मेट्रो ३ च्या अखेरच्या टप्प्याचे – आचार्य अत्रे स्टेशन (वरळी नाका ते कफ परेड) उद्घाटन केले. तसेच, मुंबईतील सर्व मेट्रो मार्गांवर वापरता येणाऱ्या ‘मेट्रो वन’ अॅपचे लाँचिंग देखील त्यांच्या हस्ते पार पडले.

या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होणार असून, नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon