खोंडेवाडा सरपंचासह तिघे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; ८० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामाच्या देयकासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी खोंडेवाडा (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथील सरपंचासह आणखी दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तडजोडीअंती ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
रंगेहाथ पकडलेले आरोपी भानुदास पुंडलिक मते (४४, सरपंच रिंगणगाव, रा. खोंडेवाडा), समाधान काशीनाथ महाजन (३८) आणि संतोष नथ्थू पाटील (४९) अशी आहेत.
तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी जलजीवन मिशनअंतर्गत १ कोटी ५० लाख २३ हजार ३२१ रुपयांचे नळपाणीपुरवठा काम हाती घेतले होते. या कामाचे १ कोटी २७ लाख २३ हजार ३२१ रुपयांचे देयक अदा झाले असून उर्वरित २३ लाख रुपयांची रक्कम प्रलंबित होती. या उर्वरित रकमेच्या मंजुरीसाठी सरपंचांकडून करारनामा करून देणे आवश्यक होते.
या करारनाम्याच्या हस्तांतरणासाठी सरपंच भानुदास मते व ग्रामपंचायत सदस्याचे पती समाधान महाजन यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने ६ ऑक्टोबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव येथे सापळा रचला आणि चौघांच्या उपस्थितीत संतोष पाटील हे सरपंच मते आणि समाधान महाजन यांच्या वतीने ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी एसीबीने संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.