कल्याणमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ! बनावट सिमेंट निर्मितीचा धक्कादायक पर्दाफाश
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण पूर्वेकडील लोग्राम परिसरात नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा आणि बांधकाम क्षेत्रात प्रचंड फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे चक्क नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट सिमेंट तयार करण्याचा गोरखधंदा सुरु असल्याचे पोलिसांच्या रेडमध्ये समोर आले आहे. या प्रकरणामुळे बांधकाम उद्योगात खळबळ उडाली असून, पोलिस सुद्धा या प्रकाराने थक्क झाले आहेत.
जागरूक नागरिक पवन दुबे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा बनावट सिमेंट घोटाळा उघडकीस आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर कल्याण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
लोग्राम येथील एका गोदामात अल्ट्राटेक, अंबुजा यांसारख्या नामांकित कंपन्यांचे ‘NOT FOR RESALE’ असे स्पष्ट लिहिलेले, निकृष्ट दर्जाचे व बांधकामास अयोग्य सिमेंटचे पोते मोठ्या प्रमाणात आणले जात होते. हे खराब सिमेंट दगडासारखे खडे फोडून पुन्हा पावडर स्वरूपात तयार केले जात होते.
यानंतर ही पावडर हुबेहूब मूळ कंपनीच्या बॅगमध्ये भरून ती बाजारात कमी दरात विकली जात होती. या सिमेंटचा वापर बांधकामात झाल्यास इमारतींची मजबुती धोक्यात येऊ शकते आणि भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथे तीन ते चार ट्रक सिमेंटने भरले जात होते, तर सुमारे दहा ते बारा कामगार बनावट सिमेंट तयार करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले आढळले. चौकशीत, ही जागा नरेश मिश्रा नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे समोर आले. परंतु, पुढील तपासात हा सारा धंदा उल्हासनगर येथील नवीन भाटिया यांच्या नावाने चालवला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मोठ्या प्रमाणात बनावट सिमेंट आणि ट्रक जप्त केले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर या गोरखधंद्यामागील खरा सूत्रधार कोण आहे, तसेच या निकृष्ट सिमेंटचा बांधकामांमध्ये किती प्रमाणात वापर झाला आहे, याचा सखोल तपास होणार आहे.
या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील बांधकाम क्षेत्रातील अनेक मोठ्या नावांवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी गतीने सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.