स्वारगेट पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ऑफिसमधील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, चोरीचा माल हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : स्वारगेट परिसरातील टॉवर गल्ली येथील एका कार्यालयात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दोन सराईत आरोपींना जेरबंद करून चोरीस गेलेला माल व वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. १४ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपींनी रात्री कार्यालयात घुसून ₹८०,००० रोख रक्कम आणि ₹१०,००० किमतीची पल्सर मोटारसायकल असा एकूण ₹९०,००० किंमतीचा माल लंपास केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने संशयितांवर लक्ष ठेवले. दरम्यान, गंगामाता चौकाजवळ पल्सर मोटारसायकलवर संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक आरोपींमध्ये निखिल विजय पवार (२८, रा. रामनगर चाल, कर्वे रोड, पुणे) व अनुराग विजय पवार (२१, रा. पी. जे. के. एन. स्कूल, अप्पर इंडियनगर, बिबवेवाडी, पुणे) यांचा समावेश आहे.
या दोघांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. पुढील तपासात त्यांच्या साथीदाराचा उलगडा झाला असून, पोलिसांनी गौरव संजय पवार (२०, रा. गुलटेकडी, स्वारगेट, पुणे) यालाही अटक केली आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३८०, ४५७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोहिते, शंकर नेवसे, संजय जाधव आणि गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक यांनी मोलाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शिरीष देशमुख आणि पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी केले.