ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह वाढला, बारशातील कार्यक्रमानंतर राज थेट मातोश्रीवर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी अचानकपणे मातोश्रीवर दाखल झाले. मागील तीन महिन्यात राज यांची ही मातोश्रीवरील दुसरी भेट आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये मातोश्रीवरील पहिल्या मजल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या आधीच निघाले होते. तिथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मातोश्रीवर ते पोहोचले. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवर पोहोचले. तर शर्मिला ठाकरे या दुसऱ्या कारने आपल्या निवासस्थानाच्या दिशेने गेले.
संजय राऊत यांच्या नातवाचा रविवारी नामकरण सोहळा होता. या कार्यक्रमात राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह पोहचले होते. तर, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दाखल झाले. कार्यक्रमात उद्धव आणि राज यांच्यात काही वेळ चर्चाही झाली. बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित फोटोदेखील काढला. यावेळी राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य ठाकरे उभे राहिले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संजय राऊत व इतरांसोबतही संवाद साधला.