ठाण्यात लाचखोरीचा कर्करोग कायम; न्यायालयीन चौकशी दरम्यानच ठाणे पालिका उपायुक्त शंकर पाटोळे लाचप्रकरणात आणखी एकाला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेतील बेसुमार बेकायदा बांधकामांवर न्यायालयीन चौकशी सुरू असतानाच महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख व उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री रंगेहात पकडले. एका बिल्डरच्या तक्रारीवरून झालेल्या कारवाईत पाटोळे काही लाखांची लाच स्वीकारताना अटक झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
योगायोग असा की बुधवारी ठाणे महापालिकेचा ४२ वा वर्धापन दिन मोठ्या सोहळ्यात साजरा करण्यात आला होता. पाटोळे याही कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मात्र कार्यक्रम संपून ते कार्यालयात परतल्यानंतर काही तासांतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात ते अडकले.
२०२१ साली पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप होता. तरीही राजकीय वरदहस्तामुळे पाटोळे यांना नंतर उपायुक्त पदावर बढती मिळाली. चौकशी सुरू असतानाच बढती मिळाल्याने महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
गेल्या काही वर्षांत कळवा, मुंब्रा, दिवा, डायघर, बाळकुम आदी परिसरांत शेकडोंनी बेकायदा इमारती उभ्या राहिल्या. या बांधकामांना राजकीय आश्रय असल्याचे बोलले जात होते. राज्यात सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पळवापळवीत या बेकायदा बांधकामांना आशिर्वाद मिळणे हेच एक मोठे कारण असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दिव्यातील प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू झाल्यानंतर न्यायालयाने नेमलेल्या एक सदस्यीय समितीने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना १९ प्रश्न विचारले होते. यातील काही प्रश्न थेट शंकर पाटोळे यांच्या बढती आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीशी संबंधित होते. प्रशासनाने बुधवारी सकाळीच या प्रश्नांची उत्तरे सादर केली आहेत. मात्र त्यातील तपशील अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे.
पाटोळे यांच्या अटकेमुळे या चौकशी प्रक्रियेला नवे वळण मिळणार असून महापालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेला मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे. या प्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर आयुक्त सौरभ राव यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ठाणे महापालिकेतील लाचखोरी आणि बेकायदा बांधकामांचा रॅकेट उघड होत असताना, न्यायालयीन चौकशीची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बांधकाम व्यवसायिकाच्या मित्राने त्यांची ओळख सुशांत सुर्वे यांच्याशी करुन दिली होती. ते व्यवसायिकाला घेऊन उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या दालनात घेऊन गेले. व्यवसायिकाने पाटोळे यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता, पाटोळे यांनी त्यांना कारवाई करण्यासाठी एका कागदावर २० लाख रुपये रक्कम लिहून पैशांची मागणी केली. तसेच पुढील प्रकरणाबाबत त्यांच्या एका सहकाऱ्याशी चर्चा करण्यास सांगितले. पाटोळे यांच्या सहकाऱ्याने २० लाखापैकी १० लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या बँक खात्यात वळते करण्यास सांगितल्याने व्यवसायिकाने त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून १० लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या बँक खात्यात जमा केले होते. त्यामुळेच याप्रकरणात सुशांतवर गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.