मुंबई महापालिकेत निवडणुकीपूर्वी खांदेपालट; चार नवे सहायक आयुक्त दाखल, पाच जणांची बदली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणुकीच्या तयारीला वेग आला असतानाच बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त संवर्गात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आला आहे. शुक्रवारी आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये चार नवे सहायक आयुक्त पदस्थापित करण्यात आले असून पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत चार नवे सहायक आयुक्त
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीवरून सहायक आयुक्त संवर्गात नियुक्त झालेल्यांमध्ये –
१. संतोष गोरख साळुंखे – सहायक आयुक्त, सी विभाग
२. वृषाली पांडुरंग इंगुले – सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग
३. योगेश रंजीतराव देसाई – सहायक आयुक्त, बी विभाग
४. आरती भगवान गोळेकर – सहायक आयुक्त, आर दक्षिण विभाग
बदली झालेल्या अधिकारी
महानगरपालिकेतील अंतर्गत बदल्या पुढीलप्रमाणे झाल्या –
१. नितीन शुक्ला – बी विभागावरून के पूर्व विभागात सहायक आयुक्त
२. संजय इंगळे – सी विभागावरून नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत
३. महेश पाटील – एफ दक्षिण विभागावरून एस विभागात सहायक आयुक्त
४. अलका ससाणे – एस विभागावरून बाजार विभागात सहायक आयुक्त
५. मनीष साळवे – आर दक्षिण विभागावरून नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत
१४ उमेदवारांपैकी दहांची पदस्थापना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण १४ उमेदवारांची शिफारस केली होती. त्यापैकी सहा जणांना यापूर्वीच नियुक्ती देण्यात आली होती. नव्याने चार जणांची नियुक्ती झाल्याने आतापर्यंत १० जण कार्यरत झाले आहेत. उर्वरित चार उमेदवारांपैकी एक अद्याप कार्यमुक्त झालेले नाहीत, एकजण प्रसूती रजेवर आहे तर दोघे विभाग संलग्नता प्रशिक्षण घेत आहेत.
सहायक आयुक्तांची पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे शक्य नसल्याने, प्रशासकीय निकड म्हणून रिक्त पदांचा कार्यभार उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.