आदिवासी महिलांची दोन कोटींची फसवणूक; मुख्य आरोपी रुपेश पाटीलला गुजरातमध्ये अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गरीब आदिवासी महिलांची तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाटणाऱ्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर पालघर पोलिसांनी गुजरातमधील वापी येथे जेरबंद केले आहे. आरोपीचे नाव रुपेश पाटील असून, तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता.
पालघर तालुक्यातील बहाडोली येथील रुपेश पाटील आणि त्याची पत्नी कल्पना पाटील यांनी हा डाव रचला होता. धुकटण परिसरातील जमिनीसाठी भरपाई मिळालेल्या आदिवासी महिलांना त्यांनी लक्ष्य केले. “वार्षिक १६ टक्के व्याज” मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. जमा झालेली रक्कम गुजरातमधील एका क्रेडीट सोसायटीत गुंतवण्यात आली.
गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर महिलांनी पैसे परत मागितले. मात्र वारंवार मागणी करूनही रक्कम न परतल्याने पीडित महिलांनी मनोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा नोंद झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते.
या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नारळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विशेष मोहीम राबवली. अखेर रविवारी मुख्य आरोपी रुपेश पाटीलला वापी (गुजरात) येथून ताब्यात घेण्यात आले.
सोमवारी रुपेश पाटीलला पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी, त्याची पत्नी कल्पना पाटील आणि गुजरातमधील आणखी चार जण अजूनही फरार असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.