दारू पिऊन एसटी चालवली म्हणून गुन्हा; नैराश्यात चालकाची बसमध्ये आत्महत्या

Spread the love

दारू पिऊन एसटी चालवली म्हणून गुन्हा; नैराश्यात चालकाची बसमध्ये आत्महत्या

पोलीस महानगर नेटवर्क

अहिल्यानगर – दारू पिऊन एसटी बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चालकाने नैराश्याच्या भरात बसस्थानकात उभ्या असलेल्या त्याच बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) रात्री तारकपूर बसस्थानकात उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव सुरेश चंद्रभान धामोरे (वय ५४, रा. सारोळा कासार, ता. अहिल्यानगर) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी धामोरे हे एमएच ४० एन ८८८७ क्रमांकाच्या बसवर चालक म्हणून ड्युटीवर होते. वाहक अजय पुंडलिक यांच्यासह त्यांनी तारकपूर–घोसपुरी अशा दोन फेऱ्या पूर्ण केल्या. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास बसस्थानकात परत आल्यानंतर ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय सहकर्मी शिवाजी मारुती खजिनदार यांना आला. त्यांनी तत्काळ ही माहिती आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांना दिली.

संपूर्ण बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर धामोरे यांना तोफखाना पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्यप्राशन केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर धामोरे प्रचंड नैराश्यात गेले. गुरुवारी त्यांनी तारकपूर बसस्थानकात उभी असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनं एसटी विभागात खळबळ उडाली आहे.

धामोरे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon