नात्याला काळिमा; चुलत काकाकडून तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील सोनगीर येथे नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच चुलत काकाने अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
ही घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. दूधवाला घरी आल्यानंतर पीडितेची आजी तिला घेऊन बाहेर गेली होती. त्याच वेळी शेजारीच राहणाऱ्या चुलत काकाने खेळण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून चिमुकलीला आपल्या घरी नेले. काही वेळाने मुलगी परत आली. मात्र, रात्री झोपताना ती अचानक रडू लागली. आईने चौकशी केली असता तिने अंग दुखत असल्याचे सांगितले. पुढे आई आणि आजीने विचारले असता पीडितेने चुलत काकाने दरवाजा बंद करून घडवलेल्या प्रकाराची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय हादरले. त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सोनगीर पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना धुळे जिल्ह्यातील ही घटना समाजाला हादरवून सोडणारी ठरली आहे.