दिल्लीत अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकणारी टोळी गजाआड; फॉर्च्यूनर, क्रेटासह ५ गाड्या जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापुर – महाराष्ट्रातून विमानाने दिल्लीला जाऊन अलीशान कारची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या टोळीकडून ५ कार आणि मोबाईलसह तब्बल ८३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईत दिल्लीतील ५ गुन्हे उघडकीस आले असून, ४ सराईत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यातील कार चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने तपास करताना सोलापूर पोलिसांनी एका संशयित फॉर्च्यूनर कारचा तपास केला असताना पोलिसांना क्लू मिळाला. यावेळी कारचे इंजिन नंबर आणि चेसी नंबर बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत आरोपी दिल्ली आणि उत्तर भारतातून गाड्या चोरून बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात विक्री करत असल्याचे उघडीस आले. त्यामुळे, पोलिसांनी अधिक तपास करुन कारवाई केली.
या प्रकरणी अजीम पठाण, प्रमोद वायदंडे, फिरोज मोहम्मद आणि इरशाद सय्यद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचा साथीदार हफिज आणि लखविंदर सिंग यांचा अद्याप शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या टोळीतील बहुतांश आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १ फॉर्च्युनर, ३ हुंडाई क्रेटा आणि १विटारा ब्रेझा कार असा एकूण ५ वाहनांसह ८३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, महागड्या अलिशान गाड्या चोरुन विकायचा गोरखधंदा मांडेलेल्या या चोरांनी महाराष्ट्रात आणखी किती गाड्या विकल्या आहेत, कुठून-कुठून या गाड्यांची चोरी केली आहे, याचा तपास सुरू आहे.