अवैध शस्त्र व बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना भिवंडी पोलिसांनी अटक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे: भिवंडीमध्ये अवैध शस्त्र व बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये लपवून ठेवलेली ४८ बंडल बनावट नोटा, १ पिस्टल व १ जिवंत काडतुससह जप्त झाली आहे. या कारवाईत इको स्पोर्ट कारसह ६,३३,४५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना २९ सप्टेंबर २०२५ रोजी माहिती मिळाली की, आरोपी बनावट नोटा बदलण्यासाठी मिल्लतनगर, भिवंडी येथे येणार आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने ममता हॉस्पिटलजवळ, चाविंद्रा रोडवर सापळा रचून आरोपींना पकडले.
अटक केलेल्या आरोपींची नावे:
१. शिवानंद ज्ञानेश्वर कोळी, वय २४, रा. सिहंस्थ नगर, पाथर्डी फाटा, नाशिक
२. राहुल रामदास शेजवळ, वय २४, रा. सिहंस्थ नगर, पाथर्डी फाटा, नाशिक
सदर प्रकरणात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम ३७(१), १३५ लागू करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी बनावट नोटा खऱ्या भासवून बदलण्याचा प्रयत्न करत होते.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अशा प्रकारच्या बनावट नोटा बदली करण्याच्या आमिषाला बळी पडू नये. अशा संदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. अमरसिंह जाधव व सहा. पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक २ भिवंडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमने केली आहे.