जिल्हापरिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून सहा वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक महेंद्र खैरनार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यध्यापकाने दोन दिवसांपूर्वी हे कृत्य केले होते. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगताच कुटुंबीयांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ या मुख्याध्यापकाला अटक केले. महेंद्र खैरनार असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे .दरम्यान या आधी २०१९ साली ग्रामस्थांनी महेंद्र खैरनार मुलींसोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार गट विकास अधिकाऱ्याकडे केली होती.
तसेच त्या तक्रारीत मुख्याध्यापकाची बदली करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय .या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाची जलदगतीने चौकशी करावी तसेच या प्रकरणी पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.