भिवंडी पोलिसांसाठी ‘वेलनेस सेंटर’ची सुरूवात; मानसिक स्वास्थ्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – ठाणे पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या भावनिक व मानसिक स्वास्थ्याच्या गरजांकडे लक्ष देण्यासाठी आजपासून भिवंडी येथे ‘वेलनेस सेंटर’ कार्यान्वित झाले आहे. ठाणे पोलिस आयुक्त मा. आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून व मा. पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उभारण्यात आला आहे.
परिमंडळ २, भिवंडी कार्यालयातील या वेलनेस सेंटरचे उद्घाटन मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे) श्री. विनायक देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपायुक्त श्री. शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन सांगळे, श्री. विजय मराठे तसेच परिमंडळातील सर्व सहा पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
या उपक्रमाची अंमलबजावणी आहान फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या फाउंडर व सीईओ सोनाली पाटणकर यांच्यासह श्री. उन्मेष जोशी आणि श्री. स्वप्निल पांगे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य व भावनिक स्थैर्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
सन २०१२ पासून कार्यरत असलेली आहान फाउंडेशन मुलांच्या आणि प्रौढांच्या मानसिक आरोग्यासाठी विविध राज्यांत शासनासोबत अनेक कार्यक्रम राबवते. यात रिस्पॉन्सिबल नेटिझनशिप, सायबर वेलनेस सेंटर, ऑटिझम संदर्भातील जनजागृती व प्रशिक्षण आदी उपक्रमांचा समावेश आहे.
या वेलनेस सेंटरच्या स्थापनेसाठी डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त (मुख्या-१) यांनी विशेष सहकार्य केले. या निमित्ताने पोलिस दलाच्या तणावमुक्त आणि सक्षम कार्यप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.