‘रॉ’ एजंट असल्याचं भासवून बँक कर्मचाऱ्याची ४ कोटींची फसवणूक; पर्वतीत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. ‘रॉ’ गुप्तचर यंत्रणेचा एजंट असल्याचं भासवून एका बँक कर्मचाऱ्याला तब्बल ४ कोटींनी गंडा घालण्यात आला आहे.
२०१९ पासून सुरू असलेल्या या फसवणुकीत, ३८ कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार असल्याचं सांगून तक्रारदाराकडून वेगवेगळ्या नावाखाली पैसे उकळले गेले. प्रोसेसिंग फी, वकिलांची फी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू अशा कारणांवरून रकमेची मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ‘कॉन्फरन्स कॉल’ झाल्याचा बनाव रचून तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार अधिकाऱ्याचे काही नातेवाईकच सामील असल्याचंही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
तक्रारीनुसार, शुभम सुनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.