प्रेमाच्या जाळ्यात फसवणूक…! १९ वर्षीय तरुणीला गर्भवती करणाऱ्या आरोपीला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
रसायनी – नवरात्रच्या भक्तीमय वातावरणात स्त्रीशक्तीचा उत्सव साजरा होत असताना, रायगडमधील रासायनीमध्ये स्त्रियांना लग्नाचं आमीष दाखवून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिस तपासानुसार, खालापूर तालुक्यातील पीडित तरुणीशी पनवेल तालुक्यातील १९ वर्षीय तरुणाने दीड वर्षापासून संपर्क साधला. प्रेमात रूपांतर झालेल्या या नात्यादरम्यान आरोपीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडित तरुणीने लग्नाची अट घातली.
आरोपीने तिच्यासोबत कायदेशीर विवाह न करता “श्री समर्थ विवाह मंगल केंद्र, कर्जत” येथे लग्न झाल्यासारखे बनवले. नंतर आरोपीने पीडितेवर मनमानी करीत तिला माहेरीच ठेवून तिच्याशी संमतीशिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधांमुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली.
पीडित तरुणीने आरोपीला गर्भधारणेची माहिती दिली असता, त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन मनाविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रासायनी पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे पुढील तपास करत आहेत.