चिमुकल्याला चापटांचा फटका! उल्हासनगरात प्री-स्कूल शिक्षिकेविरोधात गुन्हा; मनसेचे ‘स्टाईल’ आंदोलन गाजले
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगरातील एक्सलंट किडवर्ल्ड या प्री-स्कूलमध्ये एका चिमुकल्याला शिक्षिकेकडून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर संतापाची लाट उसळली असून, संबंधित शिक्षिका गायत्री पात्रा हिच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, कविता शिकविताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेने चिमुकल्याच्या गालावर चार चापट लगावल्याचे स्पष्ट दिसते. शेवटी तो मुलगा प्रतिकार करीत तिचा हात पकडताना दिसतो. ही घटना समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.
ही घटना प्रकाशात आल्यानंतर मनसे आक्रमक झाली. मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सोमवारी शाळेसमोर ठिय्या देत जोरदार आंदोलन केले. शाळेचा बॅनर फाडून, शाळा प्रशासनाला जाब विचारत त्यांनी पोलिसांना निवेदन दिले.
मनसेच्या तीन ठोस मागण्या
१. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन व्हावे.
२. शिक्षकांची मानसिक चाचणी बंधनकारक करावी.
३. शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
या प्रकरणी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली. त्यामुळे पुढे शाळा प्रशासन अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.