कल्याणमध्ये नशेखोरांचा दहशतवाद! नागरिक त्रस्त, पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात नशेखोरांचा हैदोस सुरू असून नागरिक अक्षरशः दहशतीखाली जगत आहेत. रात्री अपरात्री घरांच्या खिडक्या तोडणे, दारं ठोठावणे, महिलांची छेड काढणे, घरांवर दगडफेक करणे अशा प्रकारांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप माने यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी केल्या तरी ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही दिवसांपूर्वी तर नशेखोरांनी एका घराची वीजपुरवठा तोडून टाकला होता, परिणामी ते घर चार दिवस अंधारात होते. इतकी दहशत पसरली आहे की, नागरिक दरवाजा उघडण्याआधी मोबाईलवरून ओळखीची खात्री करून घेत आहेत.
पूर्वी डीसीपी अतुल झेंडे यांच्या मोहिमेमुळे नशेखोरांवर पोलिसांची दहशत निर्माण झाली होती; मात्र आता पुन्हा ते डोके वर काढत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.