विक्रोळीत हृदयद्रावक घटना! प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; युवक मृत, युवतीला पोलिसांनी वाचवले
रवि निषाद / मुंबई
मुंबई – विक्रोळी पार्कसाईट परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आयआयटी मार्केट महात्मा फुले नगर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय श्रवण विनोद शिंदे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडे दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये नेले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ३:५० वाजता त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक चौकशीत मृतक श्रवण याचे तेथेच राहणाऱ्या दीक्षा दयानंद खोडताळे (१९) हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. श्रवणने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दीक्षेला शिवीगाळ केली. या संतापातून तिनेही आपल्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु बीट मार्शल-१ मधील पोलिस हवालदार ठोकळ व बीट स्पेशल ससाने यांनी घटनास्थळी वेळेवर धाव घेत, दरवाजा तोडून दीक्षेला वाचवले. तिला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.