पुणे रेल्वे स्थानकात गुजरातच्या तरुणाकडून तब्बल ५१ लाख रुपयांची रोकड जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे रेल्वे स्थानकात बॅग स्कॅनर मशीनद्वारे प्रवाशांचे सामान तपासणी केली जात असतानाच एकाकडे तब्बल ५१ लाख रुपयांची रोकड आढळून आली. आरोपीने पैशांविषयी कोणताही समाधानकारक खुलासा दिला नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. संबंधित तरुण हा गुजरात राज्यातील असून त्याच्या दोन बॅगेमध्ये पैसे भरलेले होते. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. तर, ही रोकड जप्त करून आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. फरीदखान जफरउल्लाखान मोगल (२४) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.
आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अंब्रेला गेटसमोरील सरकता जिना चढून पादचारी पुलावर बॅगेज स्कॅनर मशीनद्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरू होती. यावेळी फरदीनखान याच्या जांभळ्या रंगाच्या बॅगेत सुमारे २२ लाख रुपये तर लाल रंगाच्या बॅगेत सुमारे २९ लाख रुपये आढळले. आरपीएफ निरीक्षक सुनीलकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली एएसआय प्रदीप चौधरी, एएसआय संतोष जायभाये, एएसआय विलास दराडे, एएसआय संतोष पवार, कृष्णा भांगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जप्त केलेली रोकड आणि आरोपी पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे देण्यात आला आहे.