ठाण्यात १७ सप्टेंबरपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी; शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय

Spread the love

ठाण्यात १७ सप्टेंबरपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी; शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी १७ सप्टेंबरपासून शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. पुढील ३ दिवस, म्हणजेच १७ ते १९ सप्टेंबर २०२५ या काळात २० चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल होणार असून, वाहनचालकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे. या आदेशानुसार, मुंबई, नवी मुंबई आणि घोडबंदरहून येणाऱ्या अवजड वाहनांना ठाणे शहरात येण्यापासून रोखले जाणार आहे. कोपरी नाक्याजवळ आणि कासारवडवली येथे पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. ही वाहने शहरात न येता पूर्व द्रुतगती महामार्गावरून आणि घोडबंदर रोडवरूनच पुढे जातील.

याचप्रमाणे, कळवा, मुंब्रा, नारपोली, भिवंडी आणि कोळगाव येथील प्रवेश मार्गांवरही अवजड वाहनांसाठी ‘नो एंट्री’ असेल. मुंबईहून येणारी वाहने शीळफाटा मार्गे, मुंब्राहून येणारी वाहने बायपास मार्गे आणि नाशिक, वाडा तसेच भिवंडीहून येणारी वाहने बायपासचा वापर करून शहराबाहेरूनच जातील. या बदलांमुळे शहराच्या रस्त्यांवरील भार कमी होईल, अशी अपेक्षा आहे. वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, हा आदेश १७ सप्टेंबरपासून ते १९ सप्टेंबरपर्यंत लागू असेल. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon