गोराईतील समाजसेविका डॉ. सुनिता चव्हाण यांना “प्राइड ऑफ स्पंदन” पुरस्कार
रवि निषाद / मुंबई
मुंबई – बोरिवली (प.) येथील गोराई परिसरातील वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनिता चव्हाण यांना त्यांच्या बहुमूल्य सामाजिक कार्य व वैद्यकीय योगदानाची दखल घेऊन यावर्षीचा “प्राइड ऑफ स्पंदन” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या “इच्छामरण” या कथासंग्रहाला “स्व. राजाराम डाकवे साहित्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. येत्या शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कराड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. डॉ. सुनिता चव्हाण या गेल्या २५ वर्षांपासून गोराई येथे वैद्यकीय प्रॅक्टिस करत असून त्यांनी सामाजिक जाणीव जपत अनेक उपक्रम राबविले आहेत. सैनिकांचे कुटुंबीय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक गरजूंना मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी त्या युवा मंच, कांदिवली या संस्थेबरोबर कार्यरत आहेत. त्याचबरोबर टच संस्थेतील चार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युनिसेफ व पेट या संस्थांशी त्या संलग्न असून, आपल्या साहित्य विक्रीतून मिळणारी संपूर्ण रक्कम त्या या सामाजिक संस्थांना दान करतात. पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती असोत किंवा रुग्णांची गरज असो, त्या नेहमी मदतीसाठी पुढे सरसावतात. कर्णबधिरांना श्रवणयंत्र, मातंग समाजासाठी साहाय्य, तसेच आई-वडील व भावाच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान आणि वस्त्रदान अशा अनेक कार्यांमध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. साहित्य क्षेत्रातही डॉ. चव्हाण यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भयातून निर्भयाकडे, संवाद सेतू यांसारख्या आरोग्यविषयक पुस्तकांच्या तब्बल नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच विविध शाळा व महाविद्यालयांत मासिक पाळी व त्याविषयीच्या समस्या, स्तनकर्करोगाविषयी जागरूकता या विषयांवर त्या व्याख्याने देतात. अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकांतून त्यांचे समाजप्रबोधनात्मक लेखन सातत्याने प्रसिद्ध होत आहे.
त्यांच्या या व्यापक कार्याची दखल घेऊन त्यांना “प्राइड ऑफ स्पंदन” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच “स्व. राजाराम डाकवे साहित्य पुरस्कार” मिळाल्यामुळे त्यांची साहित्यिक वाटचाल अधिक उज्ज्वल झाली आहे. समाजासाठी अखंड योगदान देणाऱ्या डॉ. सुनिता चव्हाण यांचा हा सन्मान म्हणजे सामाजिक व साहित्यिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.