राजस्थान-मध्यप्रदेशहून आणलेला तब्बल ७५ लाखांचा ‘एम.डी.’ अंमली पदार्थ ठाणे गुन्हे शाखेच्या हाती
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांनी राजस्थान–मध्यप्रदेश सीमेवरून छुप्या मार्गाने अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला तब्बल ७५ लाख २२ हजार ५०० रुपयांचा ५०१.५० ग्रॅम वजनाचा एम.डी. क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा, घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हुंदाई आय २० (क्र. MP-09-DC-2908) मधून एक इसम नाशिक महामार्गावरून मुंब्याकडे अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार आहे. त्यानुसार खारीगाव टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलीस पथकाने सुरेशसिंह गंगासिंह तंवर (वय ३५, रा. रतलाम, मध्यप्रदेश) यास गाडीसह ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून ५०१.५० ग्रॅम एम.डी. पावडर हस्तगत झाली.
या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ७४१/२०२५ एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात तंवर याने आपल्या साथीदारांसह – कुलदिपसिंह परिहार आणि अभिषेक जैस्वाल – ठाण्यात विक्रीसाठी हा माल आणल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीसांनी दि. १२ सप्टेंबर रोजी कुलदिपसिंह परिहार याला अटक केली असून न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की आरोपी हे मूळ मध्यप्रदेशचे रहिवासी असून त्यांनी राजस्थान–मध्यप्रदेश सीमेवरील गावांमधून अंमली पदार्थ आणून ठाण्यात विक्रीसाठी पुरवठा केला. सध्या पाहिजे आरोपी अभिषेक जैस्वाल याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोउनि. दिपक घुगे, पोउनि. रविंद्र पाटील, सपोउनि. दयानंद नाईक तसेच पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.